Arrow Left
profile

Thoughts become Things!

Don't Worry पण ते दिसू द्या की चेहऱ्या वरी!


।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

माझाव्यापारच्या नवीन पत्रात आपले स्वागत आहेत. आजकाल पत्र कोणी लिहित नाही ना. मला तर पत्र फक्त शाळेत ४-५ मार्क असलेला एक प्रश असायचा इतकंच माहिती होतं. कधी कोणाचं पत्र आलंच नाही. मी जसा जसा मोठा होतं गेलो तसं तसं विज्ञान, टेकनॉलॉजि वाढतं गेली आणि मला कधी पत्राचा वापर करण्याची वेळ आलीच नाही. उलट नवीन येणाऱ्या टेकनॉलॉजि शिकून घेतल्या नाहीत तर मागे पडू ही भीती नेहिमी असायची ती वेगळीच.

पण आयुष्य आपल्याला इतक्या वेगवेगळ्या मार्गांनी घेऊन जातं ना की काय सांगावं. एन्जॉय करणे ह्याच्या बाहेर काही दुसरे करणे (दुसरे म्हणजे चिंता, घाबरणं, वैताग, चिडचिड हे सगळं ) म्हणजे मला मूर्खपणाच वाटतो. झालं आहे ते आहे. हसत हसत मार्ग काढूया अजून करणार तरी काय ना?

पॉईंट हा आहे की, कोणाला माहिती होतं शाळेमधे पत्र लिहा ह्या प्रश्नाचा राग येणारा व्यक्ती दर आठवड्यात पत्र (लेखं) लिहिलं आणि एकटा नाही असेच पत्र लिहिण्याची (लेखं लिहिण्याची) आवड असणाऱ्या ग्रुप पण त्याच्या सोबत असेल? म्हणून एन्जॉय करावा. एक श्लोक सांगतो गीते मधला.

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।

अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः॥

हा भगवतगीते मधला श्लोक बऱ्याच जणांना माहिती असेल. ह्या श्लोकात साक्षात भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात,

सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग करून फक्त मलाच शरण जा.

मी तुला सर्व पापी प्रतिक्रियांपासून मुक्त करीन; घाबरू नका.

श्लोकामधले शेवटचे दोनचं शब्द वाचा. बाकी पण अर्थ खूप मोठा आहे तो पहात बसलो तर आजचा विषय बाजूला राहून जाईल. शेवटचे दोन शब्द आहेत घाबरू नका (मा शुचः). चिंतेतूनच आपल्याला घाबरायला होतं. डोन्ट वरी इतकं साधं आणि सोप्प श्रीकृष्ण भगवान आपल्याला सांगत आहेत. पण मला साधं सांगा Don't Worry हे दिसायला पाहिजे का नाही चेहऱ्यावरी? कायम काहीतरी भय, चिंता, वैताग हे का आपण सगळ्यांनी बनवले आणि आपल्या मधे घेतले काय माहित?

आज मी लिहिणार आहे एका स्पोर्ट्स बद्दल कारण भगवतगीता वाचायच्या आधी मी खेळायला शिकलो आणि "मा शुचः" हे मी आधी खेळांमधून शिकलो नंतर मला गीता समजली. कसं ते सांगतो.

Don't Worry

खेळण्याबद्दल बोलूया. खेळणे म्हणजे संध्याकाळी गल्लीमधे सगळे पोरं येऊन गोंधळ घालतात मी त्या बद्दल बोलतं नाहीये. खेळ म्हणजे स्पोर्ट्स. जे आपण टीव्ही वर बघतो आणि काही जण त्या मधे आपलं करियर करतात तो स्पोर्ट्स. आपल्या भारतीयांना क्रिकेटच्या बाहेर कुठला स्पोर्ट्स असतो ह्याचा अंदाज जरा कमीच आहे. पण मी सांगतो का शिस्तबद्ध खेळाची सवय का असावी?

उदाहरणं घेऊन सुरवात करू. माझे दोन मित्र आहेत दोघेही बिझनेस करतात. सेल्स त्यांच्या बिझनेस मधे त्यांना अगदी लोकांना बोलून करावा लागतो स्वतःला. आज टीम आहे पण स्वतः विसरू नये म्हणून ते आजही सेल्स करण्याचा प्रयत्न करतात.

आता सेल्स म्हणजे १० लोकांसोबत बोलणें. काही हो म्हणतील काही नाही, काय चुकलं ते शिका आणि पुन्हा पुढच्या १० लोकांना भेटा आणि माहिती द्या. आता दोघे माझ्या सोबत भरपूर गप्पा मारतात, दोघांचं वाचन पण चांगलं आहे. पण एक फरक आहे की त्या मधल्या एकाला फूटबॉल मनापासून आवडतो आणि तो खेळतो पण. वेळ मिळेल तसा खेळतो आणि एकदम उत्साहाने खेळतो.

आता मी दोघांसोबत जेंव्हा जेंव्हा गप्पा मारत बसतो मला दोघांच्या विचारांमध्ये इतकी मोठी दरी सापडते आणि ही दरी का असेल हा विचार केला तर उत्तर मला स्पोर्ट्स खेळणे आणि न खेळणे ह्या मधला फरक इतकाच जाणवतो.

आता सेल्स हा असा विषय आहे की ज्या मधे तुम्ही कोणं कोणं आपल्याला नाही म्हणाले हा विचार सोडून, उत्साहाने रोज एका नवीन व्यक्तिसोबत बोलतात तो आनंदाने तुमची वस्तू विकत घेतो आणि तुम्ही चांगले सेल्स मॅन म्हणून ओळखले जातात. पण नाही म्हणलेले लोकं विसरणं सोप्प आहे का? सेल्स केलेल्याने एकदा स्वतःला विचारून बघा!

सेल्स न जमलेल्या व्यक्तींचे काही वाक्य सांगतो. जे ते मनात किंवा जवळच्या मित्रांना नक्की बोलून दाखवतात.

१. "आत्ता मला म्हणे पैसे नाही पॉलिसी घेण्यासाठी आणि कार बुक केली दुसऱ्या दिवशी. काय खोटं बोलतात ना लोकं."

२. "किंमत नाही रे लोकांना. मी इतकं जीव तोडून सांगितलं तर ते नाही समजलं पण कुठे तरी ऍड पहिली म्हणे आणि गेले सगळे फिरायला. मला एक फोन केला असता ना स्वस्ता मधे करून दिल असतं."

३. "मित्र म्हणून तुला विकत घे म्हणतो आहे. होऊ दे मित्राचा फायदा. तू चॅरिटी केली समज."

असे वेगवेगळे शब्द, वाक्य बोलून सुद्धा विकलं जात नाही आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी उठून विकायला निघायचं हे करायला वेगळी हिम्मत लागते. सोप्प नाहीये. आता माझ्या दोन मित्रांपैकी जो स्पोर्ट्स खेळत नाही ना त्याला पण हे सगळं माहिती पण एखाद्या रिजेक्शन मधून बाहेर पडायला त्याला जितका वेळ लागतो तितका स्पोर्ट्स खेळणाऱ्याला नाही लागतं.

मी एकदा फूटबॉल ज्याला आवडतो त्याला विचारलं, "कसं रे जमवतो तू हे? इतके लोकं नाही म्हणल्यावर दुसऱ्या दिवशी त्याचं उत्साहात पॉलिसी विकायला कसा बाहेर पडतो?"

त्याने दिलेलं उत्तर मला फार आवडलं तो म्हणाला, "अरे मी फ़ुटबॉल चा प्लेअर आहे. मला गोल मारायला निघालो त्याच क्षणी हे माहिती असतं की १० जण मधे पाय घालायला येणार आहेत. त्यांच्या पासून वाचवूनच बॉलला पुढे न्यायचं आहे. त्यात त्यांनी काही काढून बॉल काढून घेतला आणि त्यात मी परत "शिट यार, काय हा बॉल काढून घेतो, काय मधे मधे करतात, एक गोल करू दिला पाहिजे." हे असले विचार जर केले तर निश्चित हारणार हे मला माहिती आहे. तीच शिकवण मी इथे सेल्स मधे वापरतो. एखादा नाही म्हणाला तर तो असाच आहे, तसाच आहे, काय समजत नाही त्याला, हे विचार विक्री करून देणार तर नाहीच आणि कदाचित होणारी विक्री पण थांबवतील. हे मला चांगलं माहिती. तर मी न झालेल्या सेल्सचा विचारही करत नाही. विचार डोक्यात येण्याच्या आत मी पुढचा सेल्स करायला निघून त्याला माहिती देऊन नवीन सेल्सचं confirmation घेत असतो. जसा मी फूटबॉल मधे बॉल एका नंतर दुसरा नंतर तिसरा असं करत करत गोल पर्यंत नेतो. फॉर मी बोथ आर जस्ट गेम. I just play without any worry."

मला हे शंबर टक्के पटलं आणि हाच फरक आहे स्पोर्ट्स खेळणाऱ्या आणि न खेळणाऱ्यांमध्ये. त्यांनी हारून पुन्हा उभं राहून जिंकणं पाहिलेलं असतं. छोट्या पातळीवर असेल पण अनुभव असतो. न खेळणारा हे समजूच शकतं नाही.

माझ्या आवडीचा स्पोर्ट्स कुठला?

क्रिकेट तर मी इतका मन लावून खेळत नाही. मग माझ्या आवडीचा स्पोर्ट्स कुठला? तो आहे मार्शल आर्टस्. जो मी लहानपणी शिकलो, खेळलो, प्रॅक्टिस केली आणि मोठा होता होता विसरलो की हा आपल्या आवडीचा स्पोर्ट्स आहे.

टीव्ही आणि सोबतच्या मित्रांमुळे मी जिमच्या नादाला लागलो. ते पण कधी करत होतो कधी नव्हतो पण मला जे पाहिजे ते काही मला जिम मधून मिळत नव्हतं. व्यायाम पाहिजे सवय पाहिजे म्हणून मी जिम करत होतो आणि एक दिवस माझी नजर पडली आमच्या जिमच्या समोर सुरु झालेल्या क्लास वर. मार्शल आर्टस् लाच चायनीज मधे वू शु म्हणतात तर हा वू शू चा क्लास होता.

माझी जुनी आवड पुन्हा सुरु करावी म्हणून मी एक दिवस जिम झाल्यावर क्लास मधे डोकावून पाहिलं तर चाळीस एक लहान मुलं प्रॅक्टिस करत होते. सगळ्यात मोठा मुलगा शोधावा म्हणून मी सगळ्यांवर नजर फिरवली आणि मला १-२ जणांना बघून हे अकरावी बारावी ला असावे असं वाटलं. मी इतका मोठा. आता मनानी जरी मी लहान असलो तरी शरीराने मी मोठाच होतो सगळ्यांमध्ये. अजून दोन वर्षात माझ्या मुलाला वू शू चा क्लास लावणाऱ्याच्या वयाचा मी ह्या लहान मुलांमधे येऊन शिकणार? हा प्रश्न माझ्या समोर आला.

आणि जसं मी सुरवातीला सांगितलं ती worry दिसू लागली माझ्या चेहऱ्या वरी.

काय करावं? आवड तर फार आहे. तुम्ही विचार करा ना एक लहान मुलगा ज्याने मोठं होता होता फक्त जॅकी चॅन आणि ब्रूस ली चे चित्रपट पाहून एक दिवस ह्यांच्या सारख्या कीक्स आणि उद्या मारणार इतकाच विचार केला आहे आणि त्या छोट्या मुलाला आता ते सगळं शिकवणारा व्यक्ती भेटला. पण झालं इतकंच होतं की शिकवणारा व्यक्ती भेटला तेंव्हा तो छोटा राहीला नव्हता.

आता नेमकं काय झालं? मी क्लास ला गेलो का नाही गेलो? माझी आवड मला पुन्हा मिळाली का? ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात देतो. एक एक भन्नाट गोष्टी झाल्या क्लास लावे पर्यंत सांगतो सगळं पुढच्या आठवड्यात. मी भेटच असतो प्रत्येक रविवारी न चुकता तुमच्या इनबॉक्स मधे सकाळी ९ वाजता. वेळेचे एकदम पक्के आहोत आपण.

आजच्या साठी इतकंच लक्षात ठेऊया "मा शुचः" Don't worry आणि तेच दिसू द्या तुमच्या चेहऱ्या वरी.

Reader, एक सांगायचं होतं....

हा ई-मेल म्हणजे तुमचा एखादा मित्र काहीतरी खास त्याला तुम्हाला वाचायला द्यायचं असेल तर कसं नक्की वाच सांगून ते वाचायला देतो तसं समजा. कारण इंटरनेट हे इतकंच वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे की योग्य गोष्टीची आठवण करून देणारा पण कोणी तरी लागतो.

आता तुम्ही हा लेख वाचून मला रिप्लाय केला तर मला अगदी मनापासून छान वाटेल आणि दोघं जण बोलतं असले की कसं गप्पा मारल्या सारखं वाटतं ना.

माझ्या सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर मला लिंकडीन वर मेसेज करू शकतात. मी बाकी सोशल मीडिया इतकं वापरत नाही.

तुमचा मित्र,

अजिंक्य कवठेकर

Thoughts become Things!

We share our thoughts towards Entrepreneurship, home-based business, storytelling, Books and other random interests here in the Newsletter. Subscribe now for weekly updates!

Share this page